दुचाकी
जगातील समस्त रस्त्यावर धावणाऱ्या ‘तेलचर’ प्राण्यामध्ये वेगवान आणि गडबड गोंधळ करणारा वंश प्राणी. निदान भारतात तरी सर्वात जास्त अपघात घडवण्याचा ‘विक्रम’ नेहमी हाच वंश करीत असतो. रस्त्यावर ज्याची धूम असते असा हा दुचाकी ‘वंश’. आता ती गोष्ट वेगळी की वंशातील प्राणी थोड्या फार प्रमाणात वेगळे आणि उपद्रवी असले तरी सर्वांची उपद्रव आणि गोंधळ घालण्याची मूळ प्रवृत्ती काही केल्या जात नाही. म्हणजे होंडाची लाडकी ‘ऍक्टीव्हा’ वेगात धावतांना पेक्षा जागेवर एका ब्रेकमध्ये थांबल्यावर भल्या भल्या ‘तेलचर’ प्राण्याची ‘हवा’ जाते. नुसती ऍक्टीव्हाच नाही तर कुठल्याही नॉन गिअर गाडी उर्फ प्राणी ही किमया करून वाहतुकीची शिस्त आणि गोंधळ अगदी हमखास घडवून आणू शकते.
गिअर असलेल्या दुचाकी प्राण्याची गोष्टच न्यारी. वेडीवाकडी चाल आणि ‘अचानक’ ना संकेत देत वळणे ही खासियत. मी काय बोलू? दुचाकी सोडून इतर तीनचाकी प्राण्यांच्या मालकांना किंवा चारचाकी मालकांना याचा रोजचाच अनुभव असतो. वेगाबद्दल तर विचारूच नका. ऐंशी नव्वद तर आजकाल नॉर्मल स्पीड झाला. शंभरच्या आसपास वेगाने दुचाक्या धावतात. कधीकधी या दुचाकीच काय तर सर्व वाहनांची रस्त्यावरील उद्योग पाहून भारताचा राष्ट्रीय खेळ ‘हॉकी’ नसून ‘रेसिंग’ आहे की काय अशी जाणीव होते. आणि ‘तेलचर’ प्राण्यांची कर्तव्य आणि हक्क. म्हणजे सामान्य भाषेत ज्याला ‘वाहतुकीचे नियम’ म्हणतात. ते पाळायचे की ते नियम तोडायचे. तोडायचे पेक्षा हे दुचाकी प्राणी ते नियम झोडपून त्याला ‘यम’सदनी धाडायचे कृत्य सर्वत्र अगदी ‘नियमित’ करतात.
चारचाकी किंवा अन्य दुचाकी सोडून इतर प्राणी आकाराने अक्राळविक्राळ. आणि दुचाकी प्राणी त्यामानाने अगदी ‘छोटे नवाब’. त्याचाच ‘गैर’फायदा उचलत कधी रस्त्याच्या डाव्या बाजूने दुसऱ्या क्षणाला उजव्या बाजूच्या टोकाला. थोडक्यात स्पायडरमॅनच्या गतीने क्षणोक्षणी आपली जागा बदलतात. सिग्नलला देखील असेच. ह्यांची आपली चुळबुळ चालूच. नुसतेच रस्त्यावर नाही तर बॉलीवूडमध्येही यांचीच ‘धूम’ असते. या दुचाकी वंशावळीतील एकच प्राणी या सर्वांच्या उलट आहे. पण वंशाची खुण अनेकदा दाखवतोच. हो! तो प्राणी म्हणजे ‘सायकल’. लवकरच, यांचा जमाना येईल अशी व्यवस्था भारत सरकारने केल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पण एकूणच दुचाक्यांच्या जगात हे असेच आहे. बस ‘स्पर्धा’! हो! सगळ्याच बाबतीत. मध्यंतरीच त्या टीव्हीवर एका स्पोर्ट्स बाईकची जाहिरात पाहिलेली. जपानी लोक भारतात यांच्या बाईकचा खप पाहून ‘हुंतो’ म्हणतात म्हणे. मराठीत ‘हुंतो’ या शब्दाचा अर्थ ‘अविश्वसनीय’ असा होतो म्हणे. असो, एकूणच दुचाकींच्या सर्वच गोष्टी ‘हुंतो’ म्हणण्या सारख्या आहेत.